News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे स्व. डॉ. विजयजी बिडकर यांचा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा

जनता विद्यालय अभोणा येथे स्व. डॉ. विजयजी बिडकर यांचा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा
अभोणा, दि. ४ ऑक्टोबर : समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा व निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविणारे डांग सेवा मंडळ, नाशिक संस्थेचे माजी सचिव, आरोग्यदूत, निसर्गमित्र, क्रीडाप्रेमी, वाचनाचे व्यासंगी, दीनदुबळ्यांचे उद्धारक तथा देवमाणूस स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर यांचा स्मृतिदिन डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा आणि आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल, अभोणा यांच्या संयुक्त विद्यमाने भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. डी. व्ही. जाधव होते. यावेळी डॉ. विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्याचे स्मरण करण्यात आले.
यावेळी श्री. ज्ञानेश्वर सोनवणे व श्रीमती प्रियंका खैरनार यांनी मनोगत व्यक्त करून स्व. डॉ. विजयजी बिडकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांच्या कार्यातून समाजासाठी प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमधून तेजस्विनी गायकवाड (इयत्ता ५ वी), हर्षाली राऊत (इयत्ता ५ वी), स्नेहा ठाकरे (इयत्ता ७ वी), शुभांगी गांगुर्डे (इयत्ता १० वी), मयुरी आहेर (इयत्ता १० वी) व वैष्णवी बागुल (इयत्ता ११ वी) यांनी मनोगत व्यक्त करून स्व. डॉ. विजयजी बिडकर यांच्या कार्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.
अध्यक्षीय मनोगतात श्री. डी. व्ही. जाधव यांनी स्व. डॉ. विजयजी बिडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा व संस्थेच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री. आर. एस. आहिरे, श्री. एस. वाय. महाले, श्री. एस. एस. शेवाळे, अधीक्षक श्री. प्रितेश आहिरे, श्रीमती योगिता जाधव तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. डॉ. विजयजी बिडकर यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या सेवाभावी कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.